फेसबुक दिंडी – एक अविरत प्रवास

PALAKHI SOHALA 2016

वारी … शब्दच भारी असं काहीतरी चित्र डोळ्यांसमोर आणून ठेवतो, अन प्रवास सुरु होतो धेय्यवेड्या पावलांचा एकाच दिशेने टाळ,मृदंग,वीणा,चिपळ्या आणि पताकांसोबत. वारी काय आहे हे जाणून घ्यायचं असल तर प्रत्यक्ष वारीत सहभागी होण्याशिवाय पर्यायच नाही हे जरी तितकाच खरं असलं तरी प्रत्येकालाच वारीत दरवर्षी सहभागी होण शक्य नसतं. काहींना कामामुळे तर काहींना वयोमानामुळे वारीला मुकावं लागतं. अशाच काही गरजू लोकांसाठी सहा वर्षांपूर्वी माझ्या संकल्पनेतून “फेसबुक दिंडी – A Virtual Dindi” चा जन्म झाला. ज्ञानोबा-तुकाराम  च्या घोषात आणि ह्या प्रवासात चालता चालता सहा वर्ष कशी सरली काही कळलंच नाही.

वारी आणि त्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन गेल्या सहा वर्षात कमालीचा बदललाय असं म्हणलं तर काही वावगं वाटणार नाही. वारी म्हणजे फक्त टाळ पताका घेऊन चालणारे वारकरी नाहीत, त्यामागे आहे एक प्रबळ एकतेचा समानतेचा विचार जो संतांनी दाखवलेल्या मार्गातून वर्षानुवर्षे अधिकाधिक दृढ होत चालला आहे. अगदी दहा बारा वर्षांपूर्वी जर आपण पाहिलत तर वारी आणि पालखी सोहळ्यातील घडामोडींच वार्तांकन फक्त वृत्तपत्रांतून अगदी एखाद्या दुसऱ्या बातमीतून होत असे. आज ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात इलेक्ट्रोनिक मिडिया सोबतच सोशल मिडियावरही काही अशा प्रकारे वारीच चित्र पाहायला मिळतं जे पाहून अगदी एखाद्या नास्तिक मनुष्याला देखील वारीच आकर्षण झाल्याशिवाय राहत नाही. संतांच्या ह्या वैचारिक प्रबोधनाला प्रात्यक्षिक रूप देण्याचं सर्वात मोठ काम वारीतून होतंय असच म्हणावं लागेल.
ह्यावर्षी एका वृत्तवाहिनीवर “पंढरपूरच्या वारीचा मूळ उद्देश साध्य होतोय का?” या विषयवार चर्चा आयोजित केली होती, तसं पाहिलं तर काळानुरुप वारीत अनेक योग्य असे बदल घडलेत पण काही मोजक्या धर्मांध शक्तींकडून वारीला बदनाम करण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी वारीत प्रत्यक्ष चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला फक्त पंढरीच्या विठूरायाला भेटण्याच्या ओढेव्यातिरिक्त बाकी काहीही सुचत नाही. वाढत्या समाजासोबत अनेक नवीन प्रश्न उपस्थित होतात, वारी सोबत असलेला प्रत्येक जण हा खरा वारकरीच आहे असे समजून वारीबद्दल काहीही बोलनं नक्कीच मन दुखावणारे आहे असं वाटतं.
जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या चिरंजीवांनी म्हणजेच तपोनिधी नारायण महाराजांनी तुकोबांच्या पायी वारीच रुपांतर १६८५ साली ह्या वैभवशाली पालखी सोहळ्यात केल. श्री तुकोबांच्या पादुका देहूहून आणि कैवल्यसाम्राज्य श्री ज्ञानेश्वरमहाराजांच्या पादुका आळंदीहून पालखीत ठेऊन ज्ञानोबा-तुकोबांसह ज्ञानोबा – तुकाराम भजन करीत पालखी पंढरपूरची वाट चालू लागली. एकाच पालखीत दोन वेगळ्या पादुका पाहून अनभिज्ञ लोक नारायण महाराजांना त्याबद्दल विचारू लागले, कदाचित म्हणूनच नारायण महाराजांनी “ज्ञानोबा – तुकाराम” या भजनाची सुरवात केली. अशा प्रकारे पालखी सोहळा १६८५ साली सुरु झालेला पालखी सोहळा तुकोबारायांचे वंशज मोरे (देहूकर) यांनी आजही मोठ्या भक्तिभावाने पारंपारिक पद्धतीने  पंढरीस नेण्याची परंपरा चालू ठेवली आहे. पुढे हैबतबाबा आरफळकर यांनी १८३२ च्या पुढे आळंदीहून ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीत स्वतंत्र सोहळा सुरु केला.  ज्ञानोबा – तुकोबा पालखीत आपल्याबरोबर आहेत, त्यांच्या समागमे आपण पंढरपूरला चाललो आहोत अशीच आणि एवढीच वारकऱ्यांची धारणा असते त्यामुळे वारीच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना आपण वारकऱ्यांच्या भावनांचाही विचार करावा एवढच मनापासून वाटत.

वारीतल्या तरुणांच्या वाढत्या  सहभागावर तुमच काय मत आहे असे प्रश्न नेहमीच समोर येतात, यावर एवढच म्हणेन कि तरुणांपर्यंत जर वारी पोहोचली तरच तरुण वारीपर्यंत पोहोचतील. आमची संपूर्ण फेसबुक दिंडी टीम असेल किंवा आजच्या युगातील सर्वच प्रसारमाध्यमं असतील सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे ह्या तरुणांच्या वाढत्या प्रमाणामागे. वारी फक्त फोटोग्राफी करण्यापुरती नाही तर त्यामागचा सामाजिक समतेचा विचार समजून घेण म्हत्वाच वाटतं. वारीत पदोपदी आपल्याला ह्या सामाजिक ऐक्याची प्रचीती येतेच. गेल्या पाच वर्षांपासून केवळ एकाच धेय्यासाठी आमची टीम काम करत होती कि ज्यामुळे वारीत प्रत्यक्ष सहभागी होऊ न शकणाऱ्या देश विदेशातील जनांना आभासी दिंडीच्या रूपाने का होईना वारीत सहभागी होता यावं. ह्या पाच वर्षात अनेकांची साथ मिळाली आणि फेसबुक दिंडी नावाचं एक मोठं व्यासपीठ तयार झालं. कदाचित म्हणूनच आमच्या टीम ने ह्यावर्षीपासून समाजातील ठळकपणे भेडसावणारे प्रश्न ह्या वारीच्या माध्यमातून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न ह्या सहाव्या वर्षी जलसंवर्धन मोहीम यशस्वीरीत्या राबवून केला आहे. खंत फक्त एका गोष्टीची आहे कि फेसबुक दिंडीमधून आमच्या टीम ला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे काही संधिसाधू लोकांनी ह्या फेसबुक दिंडी संकल्पनेला कॉपी करून ऑनलाईन जगतात एकत्र आलेल्या ह्या वारकरी संप्रदायाच्या लोकांना फोडण्याचा प्रयत्न चालू केला. एकाच छताखाली सुरु असलेलं वारकरी संप्रदाय जगभरात पोहचवण्यासाठीच आमच हे धेय्य असच सुरु राहील ह्यात शंकाच नाही. वारीतला प्रत्येक क्षण आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जातो तसं ह्यावर्षी अनेक नवीन अनुभव मिळाले जे पुढच्या प्रवासाकरता नक्कीच उपयोगी पडतील. ह्यावर्षी फेसबुक दिंडी टीम ला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या प्रत्येकाला मनपासून धन्यवाद.

स्वप्नील मोरे,
फेसबुक दिंडी टीम

2 Comments

 1. Ganesh shegade July 29, 2016 6:04 am

  Jay hari mauli

 2. श्री गणेश दत्तात्रय शिंदे. July 29, 2016 7:59 am

  राम कृष्ण हरि.
  माऊली मि ही वारीत होतो परंतु रजे आभावी मी पुण्यातुन परत आलो. नंतर बारामती ते पंढरपुर आसा वारीला आलो. आपल्या फेसबुक दिंडीमुळे पुणे ते बारामती वारीच्या अपडेट्स मिळाल्या.
  धन्यवाद स्वप्निलदा.
  श्री तुकोबा राय समर्थ.

Post a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*